राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या २८ जून २०२३ रोजीच्या आदेशान्वये ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी कळविले आहे.
निवडणुकांकरीता प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या ७ जून २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, त्या टप्प्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूकीकरीता ८ जून ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरीता १ ऑक्टोबर २०२३ या अर्हता दिनांकावर नव्याने प्रारूप मतदार याद्या तयार करावयाच्या आहेत.
ज्या प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणूकांकरीता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत, अशा प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरीता प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार अर्हता दिनांकाबाबतचे प्रस्ताव कारणमिमांसा नमूद करून प्राधिकरणास सादर करणे आवश्यक आहे.
संघीय संस्थांच्या निवडणुकांकरीता सभासद संस्थांनी प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले असल्यास पुन्हा ठराव मागविण्याची आवश्यकता नाही. तथापि महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ चे नियम १० (४) मध्ये नमुद केलेल्या परिस्थितीत बदल करण्याची मुभा असलेले बदल जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी स्विकारावेत. नवीन अर्हता दिनांकामुळे सभासद संस्था, नव्याने पात्र होत असल्यास अशा संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्ती ठराव मागविण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी करावी, असेही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून कळविले आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद