मराठवाड्यातील पहिली परिषद
उस्मानाबाद
सध्याचा उस्मानाबाद जिल्हा आकाराने मोठा होता यात आताचा लातूर जिल्हा समाविष्ट होता व जिल्ह्यातील काही गावे सोलापूर जिल्ह्यात होती त्यातील दोन मोठी गावे एक म्हणजे येडशी व दुसरे कसबे तडवळे हि पश्चिम महाराष्ट्रात होती त्यातीलच कसबे तडवळे गाव हे ब्रिटीश अमलात असणारे गाव होय. ( पुढे 1982 ला लातूर जिल्ह्याच्या निर्मिती वेळी हि दोन गावे उस्मानाबाद ला जोडण्यात आली, तसा विचार केला तर बरीच गावे हि सोलापूर व लातुर जोडण्यात आली आहेत आज तेथील लोकांची उस्मानाबाद जिल्ह्यात आमची गावे यावीत अशी इच्छा आहे असो तो विषय वेगळा )
तडवळ्याला प्राचीन असा इतिहास लाभलेला आहे तेर पासून जवळ असल्याने प्राचीन अवशेष आज ही दिसून येतात चुन्याच्या घाण्याचा दगड , वीरगळ इ. गावात श्री कल्याण स्वामी (डोमगाव) यांचे शिष्य जगन्नाथ स्वामी यांची समाधी व पुरातन श्री राममंदिर आहे. तसेच भैरीसाहेब यांची समाधी व दर्गा हि यागावात असून हिंदू-मुस्लिम मोठ्या भक्तिभावाने ह्याला जगृत मानतात तर उत्सवाच्या वेळी येथील पाच पाटलांना येथील मान आहे.
येथील राजवट निजामी असल्याने कोणत्या ठिकाणी परिषद घ्यावी याची मिटिंग 1940 ला पुण्यात झाली होती यावेळी हरिभाऊ तोरणे हे हि इथे उपस्थित होते व ते तडवळ्यातील शाळेत काही काळासाठी ( 1914 त 1921 ) शिक्षक म्हणून नौकरी ला होते त्यांनी ही परिषद निजाम व ब्रिटिश सीमेवर असलेल्या तडवळ्याला घ्यावी अशी सूचना केली. तसेच शेड्युल कास्ट फेडरेश चे जिल्हा अध्यक्ष व आमदार जीवप्पा ऐदाले यांनी डॉ. बाबासाहेब यांना भेटून विनंती केली त्यामुळे पहिली महार मांग वतनदार परिषद 22 व 23 फेब्रुवारी 1941 ला ( आंग्लाई व मोगलाई ) साठी कसबे तडवळे येथे घेण्याचे ठरले. 22 तारखेला परिषदेचे उदघाटन व 23 ला अधिवेशन असा कार्यक्रम ठरवण्यात आला. ( निजाम राजवटी मध्ये राष्ट्रीय नेत्यांना भाषण बंदी होती त्यामुळे ही हे गाव व येथील लोकांना यात यावे यासाठी हे गाव निवडण्यात आले )
तडवळा गाव छोटे होते त्यात दलितांची संख्या कमी तसेच गावात दोन वेळेस म्हणजे 1937 व 1945 वेगवेगळ्या कारणांनी दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आला होता.
परंतु एवढा मोठा नेता आपल्या गावात येणार म्हंटल्यावर केशवराज देशपांडे सारख्या शेतकऱ्याने इतरांना न जुमानता परिषदेला सहकार्य केले त्याच बरोबर गणेशलाल डाळे यांनी सागाची असलेली कमानी बैलगाडी दिली होती. ती सध्या बापू माळी यांच्याकडे आहे. शंकर निंबाळकर यांनी खास एकदाणी (अत्तरदाणी ) आणली होती. गादी व पलंग बाबूराव सोनार, उषा व तक्के गणेशलाल डाळे तर टेबल, खुर्च्या शंकर निंबाळकर यांनी दिल्या होत्या. तडवळ्यात आल्यानंतर डॉ. आंबेडकरांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ५१ बैलजोड्या सहभागी होत्या. यामध्ये गणपतराव कृष्णा पाटील, श्रीमंत मारुती पाटील, शंकरराव रंभाजी पाटील, रंगुबाई पाटील, रघुनाथबुवा जोशी, नामदेव उमाप, विश्वनाथ होगले, शंकर निंबाळकर, बापू दमे, यशवंत पिराजी सोनवणे, रामभाऊ गेणू पाटील, केशवराव पाटील, गोपाळ पवार, बाशा कोरबू, माणिक मेसू भालेराव, शेटीबा सखाराम निकाळजे, साहेबराव पाटील, रघुनाथ करंजकर, मरीबा सुभान भालेराव, पांडूरंग निकाळजे, राधाबाई पाटील, केरबा वाघ यांच्या बैलजोडींचा समावेश होता.
गावातील भगवानराव भालेराव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी जीवाचे रान केले.
त्यासाठी त्यांनी स्वागत समिती स्थापन करून जाहिरात घेण्याचे ठरवले व त्यातून आलेला पैसा परिषदे साठी व राहिलेला बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याला देण्याचे ठरले.
परिषदेच्या प्रसारासाठी पंढरपूरच्या अकबर छापखान्यात प्रसारपत्रके छापण्यात आली. भगवानराव व त्यांचे सोबत मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागातील गावागावात प्रसारपत्रके वाटत फिरू लागली तर सांगोल्याला फिरत्या टॉकीज ( टुरिंग ) slide शो दाखवण्यात आले.
कार्यक्रमाच्या दिवशी बाबासाहेब ठरल्याप्रमाणे रेल्वेने बार्शीमार्गे कळंबरोड स्टेशन ला उतरले ( गाव जरी कसबे तडवळे असले तरी स्टेशन ला नाव कलंब रोड स्टेशन होते ) कार्यकर्त्यांनी स्टेशन पासून कार्यक्रमस्थळापर्यंत सुंदर कमानी उभारल्या होत्या व बाबासाहेबांची 51 बैलजोड्या असलेल्या बैलगाडीवरून हलगी ताशा च्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली तर ( 51 बैलजोड्या असलेल्या सजवलेल्या बैलगाडीवरून ही मिरवणूक काढण्यात आली. ) ( या सोनेरी इतिहासाची साक्ष देण्याऱ्या बैलगाडीला आज ही व्यवस्थित ठेवण्यात आले असून लोक दूरवरून बाहेर गावावरून ही बैलगाडी पहाण्यासाठी आज ही येतात तर प्रत्येक भीमजयंतीला या बैलगाडीवर बाबासाहेबांची प्रतिमा ठेवून मिरवणून काढली जाते तर पुणे व इतर ठिकाणी मोठ्या truk मध्ये घालून ही बैलगाडी घेऊन जातात )
ही मिरवणून परिषदेच्या स्थळी आली हजारोच्या संख्येने असणारे विविध जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांचे हात उंच करून व घोषणा देऊन स्वागत केले. ज्यावेळी बाबासाहेब येणार आहेत हे कळल्यावर जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आले. जवळपास 11 हजार लोक इथे मिळेल त्या वाहनाने आले होते त्यांच्यासाठी गावातील सर्व विहिरी खुल्या करण्यात आल्या होत्या तसेच त्यांना खिरीचे जेवण हि देण्यात आले होते. गावातील प्रत्येक नागरिकाने यावेळी काहीनाकाही मदत करून हे अधिवेशन यशस्वी केले.
या अधिवेशनात निजाम हद्दीतील दलितांना प्राथमिक शिक्षण व नवीन राज्यघटनेत निजाम हद्दीतील ‘अस्पृश्यां’ना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे इत्यादी ठराव एकमताने संमत झाले.
बडोदा व म्हैसूर येथील संस्थानांनी अस्पर्शासाठी शिक्षणाची सोय केली जमिनी दिल्या पण भारतातील सर्वात मोठे असलेले हैद्राबाद संस्थान दलितांसाठी काहीही करत नाही. यासाठी येथील समाजाने संघटना बांधून लढा द्यावा असे हि बाबासाहेब म्हणाले.
स्वत: खंबीर व्हा, शिक्षण घ्या, मला दुसऱ्या कोणी मारले असे सांगत येऊ नका, गावकी सोडा, मुले शाळेत घाला, पक्ष वाढवा’ असे आवाहन या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी उपस्थितांना केले.
अशा छोट्याश्या गावात एवढे मोठे अधिवेशन पार पडले हि येथील कार्यकर्ते व त्यांची जिद्द व बाबासाहेबांवर असलेले प्रेम श्रद्धा ह्याचे हे फलित होते.
कसबे तडवळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक व्हावे हि खूप वर्षांपासूनची लोकांची मागणी आहे ते लवकरात लवकर व्हावे हीच इच्छा व इथे भव्य अशी लायब्ररी असावी जेणे करून वाचकांना याचा लाभ घेता यावा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
© जयराज खोचरे
जयराज खोचरे इतिहास व पुरातत्व अभ्यासक
7020928941
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद