Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सूर्यघर योजनेच्या प्रसिद्धीसाठी महावितरणच्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते शुभारंभ

सूर्यघर योजनेच्या प्रसिद्धीसाठी महावितरणच्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते शुभारंभ

मित्राला शेअर करा

बार्शी:- प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेची घराघरांत पोहोचविण्यासाठी महावितरणकडून चित्ररथाची सुरुवात केली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व महावितरणचे कार्यकारी संचालक (विशेष योजना) धनंजय औंढेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ मार्गस्थ झाला.

अक्षय ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या सूर्यापासून मिळणाऱ्या सौर विजेच्या प्रत्येक कुटुंबाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री सूर्यघर- मोफत वीज योजना’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबांना आपल्या वीज बिलात शंभर टक्क्यांपर्यंत बचत करता येईल तसेच शिल्ल्क वीज महावितरणला देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. तर दुसरीकडे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा व मोफत वीज मिळेल. या दोन्ही योजनांचा फायदा घरगुती व शेतकरी ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक (विशेष योजना) धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता आशिष मेहता व कार्यकारी अभियंता रमेश राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मदने यांचेसह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने छतांवर सूर्यघर योजनेसाठी १ कोटी सूर्यघरांचे लक्ष ठेवले आहे. या योजनेंतर्गत 1 किलोवॅटसाठी 30 हजार, 2 किलोवॅटसाठी 60 हजार तर 3 किलोवॅट व त्यापुढील क्षमतेच्या सौरप्रकल्पासाठी 78 हजारांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी माध्यमांना दिली.

जिल्ह्यातील कामांचा घेतला आढावा…
पीएम-सूर्य घर मोफत वीज योजना, पीएम कुसुम सोलार, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यासह अन्य सौर योजनांबाबत कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी जिल्ह्यातील महावितरणच्या सर्वच कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत केंद्र व राज्य पातळीवरील योजनांची माहिती पोहोचावी, जनजागृती, प्रचार, प्रसार जास्तीत जास्त करून लाखो ग्राहकांना सौरपंप घेण्यासाठी तसेच छतावर सौर प्रकल्प साकारण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही औंढेकर यांनी केले.