खरीप २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, गोगलगाय, येलोमोझॅकच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादकतेमध्ये मोठी घट निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना विमा कंपनीला दिल्या होत्या व त्यांची पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पुढील २ कार्य दिवसात (शुक्रवार-सोमवार) पिक विम्यापोटी २४१ कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमुळे बळीराजाला पहिल्यांदा एवढ्या लवकर विमा रक्कम मिळत आहे अशी माहिती राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
खरीप २०२० व २०२१ च्या पिक विम्याबाबत लढा सुरू असताना देखील पंतप्रधान पिक विमा योजनेत नोंदणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना सन २०२२ मध्ये आमदार पाटील यांनी केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.
या हंगामात माहे जुलै ते ऑक्टोबर दरम्यान विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेले होते. त्यामुळे नुकसानीच्या सूचना वेगवेगळ्या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यातील प्राप्त तक्रारीनुसार पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये निष्पन्न झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीने निर्धारित केलेला २४१ कोटी रुपयांचा पिक विमा वितरित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नुकसानीचे क्षेत्र व तीव्रता जास्त असल्याने २५% अग्रीम देण्याची मागणी केली होती. त्यासाठी देखील १०४ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे, त्यांना पूर्ण रक्कम देण्यात येत असून पडताळणी करून आवश्यकते प्रमाणे शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम देखील देण्यात येईल.
नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या सर्व शेतकऱ्यांची पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २४१ कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानी प्रमाणे अनुज्ञेय पिक विमा वितरित केला जाणार आहे.
राज्य सरकारकडून देखील खरीप २०२२ मध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी भरीव मदत देण्यात आली आहे. यापोटी आजवर जिल्ह्याला सुमारे ३०४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील २४५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. तसेच ५९ कोटी रुपये मंजूर असून सदरील रक्कम देखील लवकरच प्राप्त होणार आहे.
याव्यतिरिक्त सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी जिल्हा प्रशासनाकडून २२० कोटी रुपयांची केलेली मागणी प्रलंबित असून मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या रकमेस देखील मंजुरी मिळणे अपेक्षित आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
More Stories
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ