Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांची पशुवैद्यकीय दवाखाना बार्शी येथे आढावा बैठक

लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांची पशुवैद्यकीय दवाखाना बार्शी येथे आढावा बैठक

लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांची पशुवैद्यकीय दवाखाना बार्शी येथे आढावा बैठक
मित्राला शेअर करा

लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र राऊत यांची पशुवैद्यकीय दवाखाना बार्शी या ठिकाणी बार्शी तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्यासोबत लम्पी स्किन डिसीज या आजारा संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीत बार्शी तालुक्यातील पशु आरोग्य, तसेच लम्पी या आजाराबद्दल सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. बार्शी तालुक्यात ४७६७६ गायी व ३२७४८ म्हशी असे एकूण ८३४२४ पशुधन संख्या आहे. आज मितीपर्यंत बार्शी तालुक्यात या आजाराने बाधित एकही पशुधन नाही. भविष्यात पशुधनास या आजाराची बाधा होऊ नये म्हणून, याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत तालुक्यात गावोगावी जाऊन या आजाराबद्दल मार्गदर्शन करण्यात यावे, त्याचप्रमाणे गोचीड गोमाशा निर्मूलन व स्वच्छतेचे महत्त्व याकरिता गावोगावी पशुपालक सभा आयोजित करावी, गोचीड निर्मूलनाकरिता औषधे वितरित करण्यात यावी अशा सूचना आमदार राजाभाऊ राऊत यांनी सर्व अधिकारी वर्गांना केल्या.

सध्या बार्शी तालुक्यात ग्रामीण भागात १६ व बार्शी शहरात १ असे एकूण १७ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये कार्यरत असणारे पशुवैद्यकीय अधिकारी ८, सहाय्यक पशुधन अधिकारी ३ व पशुधन पर्यवेक्षक १४ असे एकूण २५ अधिकारी वर्ग कार्यरत आहे.

या बैठकी दरम्यान आमदार राजाभाऊ राऊत यांनी मा.जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर साहेब यांना मोबाईल वरून संपर्क करून लवकरात लवकर बार्शी तालुक्यातील पशुधनासाठी लम्पी आजाराची लस उपलब्ध करून देण्याची विनंती केली, यावेळी मा. जिल्हाधिकारी महोदयांनी लवकरच लस उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.

लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार राजाभाऊ राऊत यांनी तालुक्यातील सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे की, हा आजार योग्य उपचार घेतल्यानंतर निश्चित बरा होतो, याबद्दल घाबरण्याचे कारण नाही.

या आजारामुळे पशुधन मृत होण्याचे प्रमाण केवळ १ टक्का असून या आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. या बैठकीस माजी नगरसेवक विलास आप्पा रेणके, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. महेंद्र कोळेकर व इतर पशूवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लंम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा केली आहे व लंम्पी रोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे.