Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > हनुमान जयंती निमित्त बार्शीत अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन

हनुमान जयंती निमित्त बार्शीत अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन

बार्शी शहरातील विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक मंदिरात विविध मंडळानी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
मित्राला शेअर करा

बार्शी शहरातील विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक मंदिरात विविध मंडळानी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

बार्शी शहराचे जूने प्रवेशद्वार म्हणजेच वेस या ठिकाणी प्राचीन हनुमान मंदिर. या मंदिराचा स्थापना काल लिखित स्वरुपात उपलब्ध नसला तरी जुन्या लोकांच्या बोलण्यात येणार्‍या उल्लेखानुसार दोनशे वर्षा पूर्वीपासून हे मंदिर अस्तित्वात आहे. मंदिराच्या बाजूलाच तालीम आहे. या तालमीत अनेक नामवंत मल्ल तयार झाले. जागृत देवस्थान म्हणून दर शनिवारी तसेच अमावस्येला अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

प्रत्येक गावात हिंदू धर्म विधी प्रमाणे लग्न कार्य करताना नवरदेवाला मारुतीच्या दर्शनासाठी वाजत गाजत नेले जाते ( पारणा ) व नवरदेवाला नवीन पोषाख ( शिवती ) चढवण्यात येते. बार्शी गावात हा पारण्याचा तसेच बैलपोळ्याचा मान याच वेशीतील हनुमान मंदिराला आहे.

दरवर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी अनेक भक्त दर्शनासाठी येतात व याठिकाणी महाप्रसाद म्हणजेच भोजनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये परिसरातील विजय तरुण गणेश मंडळ, मावळा ग्रुप, छावा प्रतिष्ठान या मंडळातील तरुण तसेच जेष्ठ नागरिकांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो.

याचबरोबर बार्शी शहरात अनेक हनुमान मंदिरे असून या ठिकाणी सुध्दा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेली महाप्रसादाची ही प्रथा पुन्हा सुरू झाली आहे.

ऐनापूर मारुती मंदिर, सोन्या मारुती चौक, आझाद चौक, भगवंत मंदिरसह शहरातील हांडे गल्ली तालमीतही हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.