बार्शी : मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने कुर्डूवाडी-लातूर बायपास येथील पोद्दार इंग्लिश मीडियमच्या मागे उभारल्या जाणाऱ्या भव्य भूमीवर इनडोअर स्टेडियम भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या भूमिपूजन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री यांचे खाजगी सचिव मा. संतोष पाटील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव मा. अविनाश सोलवट, तसेच उपविभागीय अधिकारी (सोलापूर १) मा. सदाशिव पडदूने हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रशांत कानगुडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

या प्रसंगी मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे यांनी या प्रकल्पामागील भूमिका विषद करताना सांगितले की, हा प्रकल्प क्रीडा व युवकवर्गासाठी प्रेरणादायी ठरेल. किरण देशमुख सर यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रीडा विभागाला कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

यावेळी संतोष पाटील यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य आणि मदतीचे आश्वासन देऊन बहुमोल मार्गदर्शन केले.
अविनाश सोलवट यांनी सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हा प्रकल्प जागतिक स्तरावर कसा नेऊ शकतो, याबाबत आपले विचार मांडले. ते पुढे म्हणाले, हे इनडोअर स्टेडियम आणि मल्टिपर्पज हॉल भविष्यात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त व सामाजिक स्तरांवर माईल स्टोन ठरेल.
कार्यक्रमाच्या अखेरीस मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी आभार व्यक्त करताना मदतीचे महत्त्व किती यावर भाष्य केले. त्यांनी गिरीश देशपांडे यांच्याशी घडलेल्या एका सकारात्मक प्रसंगाचा उल्लेख करत, सढळ हाताने मदत केल्याने कुटुंबाबरोबर समाजात सकारात्मक बदल कसा घडू शकतो, याचे उदाहरण विशद करून भविष्यात मातृभूमी विविधपातळ्यांवरून सामाजिक स्तरावर रोल मॉडेल म्हणून कार्यरत राहील.
या कार्यक्रमास मातृभूमी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, क्रीडाप्रेमी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
बार्शी जवळ सुरू होत असलेल्या बहुउद्देशीय हॉलच्या माध्यमातून क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी एक नवा अध्याय सुरू होणार असून, यामुळे बार्शी शहर व परिसराच्या विकासात नक्कीच महत्त्वाची भर पडणार आहे.
More Stories
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांना जागतिक विजेतेपद ‘ग्रँड मास्टर’ हा किताब
कलाशिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर