पंढरपूर: पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरीनामाच्या गजरात आज सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील धर्मपुरी बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीदिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव,अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, सरपंच अमोलपाटील आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी 11.30 च्या सुमारास धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी माऊलींच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.
चला पंढरीसी जाऊं। रखमुमादेविवरा पाहू॥ डोळे निवतील कान। मना तेथे समाधान ॥ संतां महंता होतील भेटी। आनंदे नाचो वाळवंटी॥
या संत तुकाराम महाराज अभंगाने हरिनामाच्या गजरात पालखीचा जिल्हा प्रवेश झाला. पालखी आगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने कला पथकाव्दारे आरोग्यविषयक विविध योजनांची वारकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले.
वारी मधील महिला वारकऱ्यांसाठी माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध व्हावे म्हणून वेंडरमशीन विसावा ठिकाणी बसविली आहे, त्याप्रमाणेच आरोग्य विभागाने वारीमध्ये प्रथमच स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे तसेच बाळासाहेब चोपदार यांचा सन्मान करण्यातआला. यावेळी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी यात्रा २०२२ या सोलापूर
जिल्हामाहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांनी टाळ हाती धरुन हरी नामाचागजर करीत पालखी सोहळ्याबरोबर विसाव्यापर्यंत पायी चालले.कारुंडे येथे विसावा घेऊन माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडेरवाना झाली. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे,आरोग्य सुविधा, स्वच्छता, सुरक्षा तसेच विद्युत पुरवठा आदी आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत