बार्शी तालुक्यात सध्या दररोज सातत्याने पाऊस पडत आहे. तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील अनेक भागात याचे पंचनामे सुरू आहेत.
परंतु अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या ४ मंडलातील ४८ गावांना अतिवृष्टी मधून वगळण्यात आले आहे. याबाबत अनेक तक्रारी व माहिती शेतकरी बांधवांनी दिली. सध्या दररोज पडत असलेल्या सततच्या पावसामुळे व या तक्रारींमुळे आज तालुक्यातील कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, कोरफळे या चार गावांना मंडल अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्या सोबत प्रत्यक्ष बांधावर भेटी देऊन शेतातील पिकांचे नुकसान, फळबागांचे नुकसान, ओढे – नाले, रस्ते आदींच्या नुकसानीची पाहणी केली. या भेटीदरम्यान गावातील शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांना नुकसान भरपाई मिळणे कामी कोणतीही काळजी करू नये असा ठाम विश्वास त्यांना दिला.
तालुक्यातील ४८ गावांना अतिवृष्टी मधून वगळण्याच्या पार्श्वभूमीवर मी मा. जिल्हाधिकारी साहेब, प्रांत अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब यांच्यासोबत चर्चा केली असून,त्याबाबतची सविस्तर माहिती घेऊन सोमवार दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. तालुक्यात झालेली अतिवृष्टी व शेतीचे मोठे नुकसान याबाबत संपूर्ण माहिती त्यांना देऊन शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करण्यासाठी त्यांना विनंती करणार आहे.
त्याचबरोबर मी मदत व पुनर्वसन मंत्री मा. विजय वडेट्टीवार साहेब, पालक मंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे यांची बुधवारी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनाही याबाबत सविस्तर माहिती देणार आहे.
या सर्व प्रयत्नां नंतरही जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर भविष्यात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी भव्य मोर्चा काढणार असल्याची ग्वाही शेतकरी बांधवांना दिली.
यावेळी या गांव भेटी प्रसंगी जि.प.माजी उपाध्यक्ष कौरव आप्पा माने, मंडल अधिकारी प्रताप कोरके, ग्रामसेवक अंकुश काटे, तलाठी सौ. एम.ए.निमगिरे, सौ.सुनिता ढोणे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
More Stories
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत