Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > परिवर्तन घडवण्यासाठी विचारांशी ठाम असणे महत्त्वाचे कॉ. ठोंबरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा

परिवर्तन घडवण्यासाठी विचारांशी ठाम असणे महत्त्वाचे कॉ. ठोंबरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा

मित्राला शेअर करा

परिवर्तन घडवण्यासाठी विचार महत्त्वाचा आहे. विचारांशी ठाम असल्याशिवाय हे शक्य नाही. असे मत भाकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी व्यक्त केले. प्रा ठोंबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित ‘मनमोकळ्या गप्पा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे, प्रा. अशोक सावळे प्रा. हेमंत शिंदे, आयोजक श्रीधर कांबळे उपस्थित होते.


निमंत्रितांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ठोंबरे यांनी सांगितले, दलित, शोषित, वंचित, पीडितांचे अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन काम करणे गरजेचे आहे. यांचे प्रश्न सोडवणे म्हणजे राजकारण आहे. परंतु सध्या राजकारण होत नाही, तर ते सत्ताकारण होते. आज कोणत्याही परिस्थितीत सत्तेसाठी जिकडे तिकडे घोडेबाजार बोकाळला आहे, असे परखड मतही त्यांनी गप्पांमधून व्यक्त केले.


तुम्ही एखाद्या विचारांशी पक्के असाल तरच तुम्ही मोठे होता. त्यातही विचार महत्त्वाचा आहे. विचार असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. सध्या देशभरात लोकशाही धोक्यात असून ती टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहनही प्रा. ठोंबरे यांनी केले. गप्पांमधून अनेक प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. बार्शीत चळवळीमध्ये आणि राजकारणात काम करत असताना माजी आमदार प्रभाताई झाडबुके, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार राजेंद्र राऊत यांच्या बरोबर विचारासाठी झालेल्या मतभेदाचे तसेच मैत्री बाबतही अनेक आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.


कॉम्रेड म्हणून काम करत असताना बार्शीत मात्र सर्वांनीच प्रेम दिले. कुणी कधी कसलाही त्रास दिला नाही, हे आवर्जून सांगायला मात्र ते विसरले नाहीत. माध्यमिक शिक्षण घेतलेल्या सुलाखे हायस्कूलचा आपल्या आयुष्यात फार मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सोलापूर येथील दयानंद महाविद्यालय विषयी आणि सोलापूर बाबतही अनेक विषयांना त्यांनी हात घातला.
राज्यासह देशभरात आणि परदेशातही अनेक व्याख्याने ठोंबरे यांची झाली आहेत. त्याबाबतचे किस्सेही उलगडून दाखवले.

हसत-खेळत रंगलेल्या या गप्पांमध्ये कॉ. ए. बी. कुलकर्णी, उमेश पवार, डॉ. प्रवीण मस्तूद यांनीही ठोंबरे यांना बोलते केले.
कार्यक्रमास यावेळी उद्योजक सुरेश शेट्टी, माजी सरपंच सुरेश कसबे, आयुब बागवान, डॉ, प्रवीण मस्तूद सचिन झाडबुके, सुधीर खाडे, शौकत शेख, कदिर बागवान, माजी नगरसेवक वाहेद शेख, प्राध्यापक देंडे,चंद्रकांत करडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश पवार यांनी केले.