बार्शी शहर आणि परिसरातील पत्रकारांच्या आरोग्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना आरोग्य सुरक्षा योजना सुरू करून ३ वर्षांसाठी आरोग्य विमा उतरवण्यात आला. तसेच शहरातील सुविधा हॉस्पिटल, साई संजीवनी हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल येथे मोफत उपचार केले जाणार आहेत, तर कोठारी लॅबोरेटरी येथे सर्व चाचण्यांवर व ओम मेडीकल येथे सर्व स्टँडर्ड औषधांवर २५% सवलत देणार असल्याची घोषणा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी गुरुवारी केली.
संघटनेच्या नूतन पदाधिकारी निवडीवेळी ते बोलत होते. यावेळी एपीआय दिलीप ढेरे, डॉ. राहूल मांजरे, सुविधा हॉस्पिटलचे संचालक नितीन आवटे, डॉ. अजित आव्हाड, ओम मेडिकलचे अमर आवटे, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रम सावळे, राज्य सचिव गणेश शिंदे, शहराध्यक्ष हर्षद लोहार, उपस्थित होते. कार्यक्रमात साप्ताहिक विभागाच्या राज्य संघटकपदी संदीप आलाट, सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अमोल आजबे, तर तालुकाध्यक्षपदी नितीन भोसले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ म्हणाले, व्हाईस ऑफ मीडिया ही केवळ पत्रकारांनी पत्रकारांच्या सर्वांगीण हितासाठी आणि विकासासाठी सुरु केलेली संघटना आहे. संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यासह राज्य आणि संपूर्ण देशभर उत्कृष्ट पद्धतीने कार्य सुरु आहे. येत्या काही दिवसात बार्शी प्रमाणेच राज्यातील पत्रकारांसाठीही सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या संघटनेच्या कार्यशाळेत बार्शीत दातृत्वाची भावना दाखवलेल्या डॉक्टरांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार असल्याचे स्पष्टीकरणही कुंकूलोळ यांनी दिले.
प्रास्ताविकात राज्य सचिव गणेश शिंदे म्हणाले, ‘बार्शी तिकडे सरशी’ या म्हणीप्रमाणेच कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही बार्शीतून होते. आणि त्याचेच अनुकरण राज्यभरात होते. जगभरात ४३ देशात चालणाऱ्या या संघटनेच्या कार्यामुळे पत्रकारांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली जाणार असल्याचे सांगितले.
बार्शीतील सुविधा हॉस्पिटल, डॉ. राहूल मांजरे यांच्या साई संजीवनी हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल येथे बार्शीतील पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी एक लाख रु. पर्यंतचे सर्व उपचार, शस्त्रक्रिया मोफत केले जाणार आहेत.
यावेळी या आरोग्य विम्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भोसले यांनी केले तर आभार अमोल आजबे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय शिंगाडे, मल्लिकार्जुन धारूरकर, जमीर कुरेशी, प्रविण पावले, मयूर थोरात, शाम थोरात, निलेश झिंगाडे, धैर्यशील पाटील, प्रदिप माळी, अपर्णा दळवी, संगिता पवार, सुवर्णा शिवपुरे, विक्रांत पवार, समाधान चव्हान, उमेश काळे, ओंकार हिंगमिरे, श्रीशैल्य माळी, भुषण देवकर, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास पत्रकारांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न