राज्यातील महत्त्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न उद्धभवतो आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोलापूर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महसूल विभागाचे अपरमुख्य सचिव नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिव शंकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आदी मान्यवरांसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एकरूख तलाव पाणी पुरवठा योजना, भिमा नदी टाकळी पाणीपुरवठा योजना, उजनी जलाशय योजना या तिन्ही योजनांतून व्यवहार्य आणि खात्रीशीर स्त्रोत तपासल्यानंतर सोलापूर शहरास पिण्यासाठी उजनीतून पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारी जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे आता निधीअभावी ही योजना रखडणार नाही. सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, सध्याची 110 एमएलडी क्षमतेची योजना सुधारित करून ती 170 एमएलडी करताना सन 2035 ला सोलापूर शहराला लागणारे पाणी विचारात घ्यावे, सोलापूर सीटी डेव्हलेपमेंट कार्पोरेशन, महानगरपालिका, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी समन्वयाने काम करून या योजनेच्या कामाला गती द्यावी, ही योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
More Stories
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश