महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी
http://www.msins.in/startup-week
या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
यासाठी अर्ज करण्याची मुदत 30 मे पर्यंत आहे. स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत प्राप्त अर्जापैकी अव्वल 100 स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी भेटते. त्यातील विजेत्या 24 स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा प्रायोगिक तत्वावर संबंधित शासकीय विभागांबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत 15 लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश ( वर्क – ऑर्डर्स ) दिले जातात. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य, प्रशासन, शाश्वतता ( स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन ), स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता आणि संकीर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी खालील ईमेल team@msins.in
अथवा 02235543099 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्टार्टअप्सनी या स्पर्धेत सहभागी होऊन शासनाच्या विविध विभागांसोबत काम करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शंभरकर यांनी केले आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद