Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > अध्यापिका विद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थिनीचा स्वागत समारंभ संपन्न,स्पर्धा परीक्षेतील यशामध्ये डीएडचा महत्त्वाचा वाटा – पोलीस उपनिरीक्षक संजीवनी काळे

अध्यापिका विद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थिनीचा स्वागत समारंभ संपन्न,स्पर्धा परीक्षेतील यशामध्ये डीएडचा महत्त्वाचा वाटा – पोलीस उपनिरीक्षक संजीवनी काळे

अध्यापिका विद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थिनीचा स्वागत समारंभ संपन्न,स्पर्धा परीक्षेतील यशामध्ये डीएडचा महत्त्वाचा वाटा - पोलीस उपनिरीक्षक संजीवनी काळे
मित्राला शेअर करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना डीएड अभ्यासक्रमाचा मोठा उपयोग झाला. विशेषतः मुलाखत देताना आत्मविश्वासाने सामोरे गेले. जिद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्याने स्पर्धेमध्ये यश संपादन करतात येते. तसेच स्पर्धा परीक्षा देताना अपयश आल्यास खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न करणे आवश्यक आहे. अभ्यासात सातत्यासाठी जिद्द आवश्यक आहे असे प्रतिपादन कु.संजीवनी काळे – तिकटे यांनी केले . त्या अध्यापिका विद्यालयात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभामध्ये बोलत होत्या.

बार्शी येथील बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापिका विद्यालयामध्ये डीएलएड नवीन प्रवेशित विद्यार्थिनींच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ. अनुसया चौगुले होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कु. संजीवनी काळे – तिकटे व मेजर गजानन तिकटे होते.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्राच्या सुरुवातीस सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बजरंग वाघमोडे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रमोद मांडे यांनी करून दिला.

अध्यापिका विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या कु. संजीवनी काळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कशाप्रकारे यश संपादन केले , परीक्षेची तयारी कशाप्रकारे केली याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षा विषयी विद्यार्थिनींच्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली. यानंतर त्यांचे पती मेजर गजानन तिकटे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी कशाप्रकारे कार्य करावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चौगुले मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. पहिल्या सत्राचे आभार प्रा. सुभाष माळी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रांमध्ये जून २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या डीएलएड परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गुलाब पुष्प व भेटवस्तू देवून करण्यात आला. त्यामध्ये प्रथम वर्षामध्ये प्रथम पाच क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी अनुक्रमे उकिरडे नम्रता, बारंगुळे संजीवनी, देशमुख मयुरी, देशमुख प्रतीक्षा, गायकवाड प्रगती व डोके सानिका तर द्वितीय वर्षामध्ये प्रथम पाच क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी अनुक्रमे परदेशी अंकिता, लंकेश्वर गीता, ताटे श्रुती, घोडके भाग्यश्री व बोराडे अश्विनी यांचा समावेश होता.

नवप्रवेशित विद्यार्थिनींचे स्वागत द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रा. सोमनाथ देंडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा रतिकांत हामणे यांनी तर आभार प्रा. जीवन लोखंडे यांनी मानले.