बार्शी – जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या महापर्वत राज श्री सम्मेद शिखरजी येथे पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत आज देशभरातील जैन समाज रस्त्यावर उतरला होता. त्याच पार्श्वभूमीवर बार्शीतही जैन समाजाने बार्शी बंदची हाक दिली. त्यास, संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, जैन समाज बांधवांनी आपले व्यापार, उद्योग बंद ठेऊन झारखंड सरकारच्या या निर्णयाचा निषेध नोंदवला.

बार्शी शहरातील जैन बांधवांनी आज सकाळी बार्शी बंदची हाक देत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सर्व जैन बांधव आणि महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. पांडे चौक येथील जैन मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. अतिशय शांत आणि शिस्तबद्ध रीतीने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चातील सहभागी जैन समाजाचे धर्मगुरू, समाजातील ज्येष्ठ मंडळी यांनी भाषण करत आपली भूमिका मांडली. तसेच, सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही केली. यासंदर्भात, तहसीलदार शेरखाने यांना निवेदन देण्यात आले.
झारखंडमधील मधूबन (जिल्हा – गिरडीह) येथील महा पर्वतराज श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने “पर्यटन क्षेत्र” म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने त्या ठिकाणी नॉनव्हेज हॉटेल्स, पब बार व इतर अशा बऱ्याच मनोरंजक गोष्टी सुरू होतील, की ज्या अहिंसा तत्वाच्या एकदम विरुद्ध असणार आहेत. त्यामुळे, जैन समाजाने आज भारत बंदची हाक दिली होती.
दरम्यान, जैन बांधवांच्या या बंदला बार्शीतील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शवला. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी विपक्ष नेते नागेश अक्कलकोटे, भाजप नेते विजय नाना राऊत, राष्ट्रवादीचे नेते कृष्णराज बारबोले, काँग्रेसचे वसीमभाई पठाण, विक्रम सावळे, इक्बाल पठाण यांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते हजर होते.
More Stories
गोरोबा काकांचा समाधी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा :- तहसीलदार डॉ मृणाल जाधव
छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गाढवे-चेडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर