कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच नाविन्यता सोसायटीचा पुढाकार
मुंबई, दि. १५ : राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्सना चालना देणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी स्टार्टअप्स विकसित करणे अशा विविध क्षेत्रात काम करण्याच्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट यांच्यामध्ये तसेच कौशल्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि इंडिया हेल्थ फंड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य करारांमुळे राज्यातील कौशल्य विकासविषयक विविध उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच स्किल इंडियाचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने हे सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज मंत्रालयात हे सामंजस्य करार करण्यात आले.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेन्द्र सिंह कुशवाह, टाटा स्टाईव्हच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टच्या उपाध्यक्षा अनिता राजन, इंडिया हेल्थ फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव जोशी यांच्यासह या संस्थांचे प्रतिनिधी अमेय वंजारी, राजर्षी मुखर्जी, श्रद्धा डे, सुहेल जमादार, अभिजीत कुमार, कौशल्य विकासच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण संचालक दिगंबर दळवी, नाविन्यता सोसायटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मिथून जॉन आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ