बार्शी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखेच्या शतक महोत्सवानिमित्त १००वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर येथे पार पडत आहे.

याचाच एक भाग म्हणून बार्शी येथील नाट्य परिषदेच्या शाखेला तीन दिवसाची भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी बार्शीकरांना मिळणार आहे. या संदर्भात नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत, अरुण बारबोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बैठक संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते नटराज मूर्ती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
बार्शी शाखेला दिनांक 21, 22 आणि 23 जानेवारीला तीन दिवस भरगच्च कार्यक्रम असल्याचे या बैठकीमध्ये सांगण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने 21 जानेवारी रोजी स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. 22 जानेवारी रोजी संगीत रजनी हा हिंदी व मराठी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम होणार असून, 23 जानेवारी रोजी भार्गवी चोरमुले, वैभव मांगले तसेच हास्य जत्रेतील कलाकार यांचा सहभाग असणारे मर्डरवाले कुलकर्णी या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
या नाट्य संमेलना दरम्यान तज्ञ व अभ्यासू साहित्यिकांच्या मार्गदर्शनाखाली एक स्मरणिका काढण्यात येणार असून, त्या स्मरणिकेच्या समितीवर बार्शीचे लेखक सचिन वायकुळे यांना बहुमान मिळाला आहे. या बैठकी प्रसंगी लेखक सचिन वायकुळे यांनी लिहिलेला लेख, विजय साळुंखे यांच्याकडे सपूर्द करण्यात आला.
बार्शी येथे होणाऱ्या तीन दिवशीय संमेलनाचे स्वागताध्यक्ष बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत असल्याचे विजय साळुंखे यांनी जाहीर केले. याप्रसंगी बार्शी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजेंद्र राऊत, अरुण बारबोले यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
या बैठकीसाठी नाट्य परिषद बार्शी शाखेचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर, कार्यवाह विजयश्री पाटील, सचिन वायकुळे, माजी नगरसेवक संदेश काकडे, श्रीधर कांबळे, वर्षा रसाळ, धीरज शेळके यांच्यासह बार्शी शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी व नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
महाराष्ट्र ढोल पथक महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शिलेदारपदी श्रीकांत जिठ्ठा आणि प्रविण परदेशी यांची निवड
बाबुरावजी डिसले पुरस्कार २०२४-२५ जाहीर
करमवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त संत तुकाराम विद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात