बार्शी शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, बार्शी नगरपरिषदेकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना या योजनांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व जेष्ठ नागरिकांनी अर्ज भरुन बँक खात्यात 3,000 रुपयांचा थेट लाभ घ्यावा. तसेच महाराष्ट्रातील व भारतातील तिर्थ स्थळांना भेट देण्याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी बार्शी नगरपरिषदमध्ये NULM विभागात संपर्क साधावा.असे आवाहन बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी केले आहे.
काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना जाणून घेऊ.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री व तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.या योजनांच्या लाभासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांच्याकडे अर्ज सादर करावेत.
राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुक्रमे मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या दोन महत्त्वकांक्षी योजना राज्य शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना-
राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे रू.3000 च्या मर्यादेत खरेदी करता येतील. उदा. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
योजनेच्या अटी:-
ह्या योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्ती हे राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि.31.12.2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केली असतील)
उत्पन्न मर्यादा:-
लाभार्थ्यांचे कौंटुंबिक वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहिल, सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे, याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोणापत्र सादर करणे आवश्यक राहिल, पात्र लाथार्थ्याने बँकेच्या खात्यात रुपये 3 हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-
आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयंघोषणापत्र (उत्पन्नाचे व उपकरण विनामुल्य प्राप्त केले नसल्याचे), शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना:-
महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे पुण्य कर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. सदर बाब विचारात घेवुन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभगाची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याव व विशेष सहाय्य विभागाकडील शासन निर्णय दि.14 जुलै 2024 नुसार राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेतून प्रति व्यक्ती 30 हजार रूपये खर्चाची कमाल मर्यादा असून यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. भारतातील 73 व राज्यातील 66 निर्धारित स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता योजनेतून एकवेळ लाभ घेता येईल. सदर योजनेतून पात्र प्रवाशांची निवड ही मा. पालकमंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात येईल.
योजनेतून निवड होण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहिल सदर अर्ज करण्यासाठी नविन वेबसाईट तयार करण्याचे काम शासन स्तरावर सुरू आहे. अर्ज करताना आधार कार्ड, रेशन कार्ड, अधिवास बाबत पुरावा, उत्पन्नचा दाखला, वैद्यकिय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक योजनेच्या अटी पालन करणेबाबत हमी इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहतील. योजनेचे अर्ज स्विकारणे कामी शासन स्तरावरून पोर्टल सुविधा उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही सुरू आहे. तत्पुर्वी योजनेच्या अनुषंगाने इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्राची पुर्तता करून आपले अर्ज योजनेचा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांच्याकडे अर्ज सादर करावे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मुख्यमंत्री वयश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न