Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

मित्राला शेअर करा

मुंबई, दि. 25 : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात घरोघरी आकाशदिवा लावला जातो आणि रांगोळी काढली जाते. याच आकाशदिवा आणि रांगोळीच्या माध्यमातून यंदाची दिवाळी लोकशाहीमय साजरी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

‘सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी’ हे लक्षात ठेवून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करावे. आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावा. जसे डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन  इ. वापरावा. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे; चुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरिता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करावा.
बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो. पण तसे नसून मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदारयादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासून घ्यावेत, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावा, 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात यावे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत

 https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 

या लिंक वर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये  (प्रथम क्रमांक), सात हजार रुपये (द्वितीय क्रमांक), पाच हजार रुपये (तृतीय क्रमांक) आणि दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. स्पर्धेची आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यंदाची दिवाळी लोकशाहीमय करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले आहे.

स्पर्धेची नियमावली :

स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत.

स्पर्धकाला आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गुगल अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे.

आकाशदिवा (आकाशकंदील) स्पर्धा :-

आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले असावे.

लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.

प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.

फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.

आकाशदिवा स्पर्धेसाठी टांगलेल्या आकाशदिव्याची चित्रफीत पाठवावी, जेणेकरून आकाशदिव्याची सजावट चहुबाजूंनी दिसू शकेल. ही चित्रफीत कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची असावी.

आकाशदिव्याच्या चित्रफितीची (व्हिडिओची) साइज जास्तीत-जास्त ३०० MB असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असावी.

आकाशदिव्याची चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, चित्रफितीत कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.

आकाशदिवा स्पर्धेंसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित आकाशदिव्याचे तीन फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

रांगोळी स्पर्धा :-

लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.

प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.

फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये.

रांगोळी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे तीन फोटो पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये घोषवाक्यांचा वापर केला असेल तर गुगल अर्जामध्ये ती घोषवाक्ये लेखी स्वरूपातही पाठवावीत.

आपले फोटो आणि चित्रफीत 

https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 

या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.

स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा.

दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ ते १५ नोव्हेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांच्या बक्षिसांचे स्वरूप प्रत्येकी पुढीलप्रमाणे असेल:

अ. प्रथम क्रमांक :- ११,०००/-
ब. द्वितीय क्रमांक :- ७, ०००/-
क. तृतीय क्रमांक :- ५,०००/-
ड. उत्तेजनार्थ :- १,००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल.आलेल्या साहित्यामधून सर्वोत्तम साहित्य निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.

स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.

स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये आकाशदिवा स्पर्धकांचे साहित्य प्रसारित केले जाईल. तेव्हा उत्कृष्ट आकाशदिवा स्पर्धकांनी आपले साहित्य जपून ठेवावे. कार्यालय आपल्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधेल.