-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
बार्शी येथील शिबिरात दोन दिवसात 1 हजार 599 लाभार्थ्यांची तपासणी
दिनांक 29, 30 ऑगस्ट रोजी माळशिरस येथे दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर होणार, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी शिबिरात तपासणीसाठी येण्याचे आवाहन
पंढरपूर, अक्कलकोट व बार्शी तालुक्यात शिबिराला चांगला प्रतिसाद, उर्वरित तालुक्यातील शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा
एकूण 22 दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराच्या माध्यमातून 15 हजार 666 लाभार्थ्यांची तपासणी करून प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना टपालाद्वारे घरपोच करणार
सोलापूर,:- जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचा सहावा दिवस संपला असून आज रोजी पर्यंत पंढरपूर अक्कलकोट बार्शी तालुक्यातील 4 हजार 859 लाभार्थ्यांनी शिबिरात तपासणी करून घेतलेली आहे. दिव्यांग व्यक्तीकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिबिराच्या ठिकाणी शासनाच्या अन्य योजना चा लाभ दिव्यांगाना देण्यासाठी संबंधित विभागाचे माहिती स्टॉल लावण्यात आलेले आहेत. अन्य शासकीय योजनातून दिव्यांगांना लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
या अभियान अंतर्गत तपासणी व निदान विशेष मोहीम दिनांक 19 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेले आहे. पंढरपूर व अक्कलकोट तालुकास्तरीय शिबिरे संपन्न झालेली आहेत या दोन्हीही शिबिरात 3260 दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली तर दिनांक 26 ऑगस्ट रोजी शिबिराच्या पाचव्या दिवशी बार्शी येथे 801 व 27 ऑगस्ट रोजी 798 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली असे एकूण सहा दिवसात 4 हजार 859 लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी करून घेतलेली आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिव्यांगात्व प्रमाणपत्र त्यांनी दिलेल्या त्यांच्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्ह्यात ही मोहीम 19 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन दिवस याप्रमाणे 22 शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून या शिबिरातून 15 हजार 666 दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांगात्वाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे. पंढरपूर अक्कलकोट या दोन तालुक्यातील तीन हजार दोनशे सात लाभार्थ्यांची तपासणी झालेली आहे. तर बार्शी येथे दिनांक 26 व 27 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालयात हे शिबिर घेतले जात आहे. तरी प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरात येऊन तपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.
तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी या शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही अडचण होणार नाही याची खात्री करावी. तसेच शिबिराच्या ठिकाणी संबंधित तालुक्यातून दिव्यांग लाभार्थीची ने – आण करण्याची व्यवस्था अत्यंत चोख झाली पाहिजे यावर लक्ष ठेवावे. शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधा अत्यंत दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य यंत्रणा यांनी काळजी घ्यावी सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी देऊन शिबिरासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. येथे आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य शासकीय योजनांची माहिती-
शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या अन्य सर्व शासकीय योजनांची माहिती प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सर्व संबंधित विभागाने त्यांची यंत्रणा त्या ठिकाणी ठेवून अत्यंत व्यवस्थितपणे समजावून सांगावी तसेच दिव्यांग व्यक्ती योजनांसाठी पात्र ठरत असतील तर त्यांना त्या योजनांचा लाभ मिळण्याबाबतचे अर्ज जागेवरच भरून घ्यावेत. एक ही पात्र दिव्यांग लाभार्थी शासकीय योजना पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले. दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ देऊन त्यांच्यात कौशल्य निर्माण करून त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
22 शिबिरातून 15 हजार 666 दिव्यांग लाभार्थ्याची तपासणी होणार-
जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण 22 शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यासाठी 15 हजार 66 दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या 1 लाख 15 हजार 755 इतकी असून यातील 68% ग्रामीण भागातील तर शहरी भागातील 32 टक्के दिव्यांग संख्या आहे. आशाताई आणि यंत्रणेतील तालुका स्तरावरील संबंधित घटकांसाठी 27 कार्यशाळा घेण्यात आले असून त्यातून 3742 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मित्राचे संचालक अभिजीत राऊत यांनी दिली.
आरोग्य यंत्रणा- परस्परात समन्वय ठेवावा-
या अभियानात आरोग्य यंत्रणा, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी, स्वयंसेवी संस्था व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन(मित्रा) यंत्रणेवर जबाबदारी असून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. त्याप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत येणारे सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत येणारे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे या शिबिरासाठी विशेष मेहनत घेत आहेत. असेच काम करून दिव्यांग व्यक्तींची योग्य तपासणी करून त्यांना वैश्विक प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी सर्वांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असेही त्यांनी सूचित केले.
शिबिराचे वेळापत्रक-
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्याकरीता दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी आणि निदान विशेष मोहिम कार्यक्रम शिबीर वेळापत्रक तालुका, लाभार्थी संख्या, शिबीर स्थळ, दिनांक, वार व वेळ निहाय पुढीलप्रमाणे –
माळशिरस – 1720, ग्रामीण रुग्णालय, माळशिरस, दिनांक 29 व 30 ऑगस्ट 2024, गुरुवार व शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
सांगोला – 1803, ग्रामीण रुग्णालय, सांगोला, दिनांक 2 व 3 सप्टेंबर 2024, सोमवार व मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
करमाळा – 1629, ग्रामीण रुग्णालय, करमाळा, दिनांक 5 व 6 सप्टेंबर 2024, गुरुवार व शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
मोहोळ – 1841, ग्रामीण रुग्णालय, मोहोळ, दिनांक 9, 10 व 12 सप्टेंबर 2024, सोमवार, मंगळवार व गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
माढा – 1292, ग्रामीण रुग्णालय, कुर्डूवाडी, दिनांक 13 व 14 सप्टेंबर 2024, शुक्रवार व शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
मंगळवेढा – 808, ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा, दिनांक 17 व 19 सप्टेंबर 2024, मंगळवार व गुरुवार सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
सोलापूर दक्षिण – 1294, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दिनांक 20 व 21 सप्टेंबर 2024, शुक्रवार व शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
सोलापूर उत्तर – 561, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर, दिनांक 23 सप्टेंबर 2024, सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता.
पंढरपूर व अक्कलकोट तालुक्याचे शिबिर संपन्न-
पंढरपूर – ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर, दिनांक 19 व 20 ऑगस्ट 2024, सोमवार व मंगळवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न झाले. तर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट, दिनांक 22 व 23 ऑगस्ट 2024, गुरुवार व शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता शिबिर संपन्न झाले.
पंढरपूर व अक्कलकोट तालुक्यात एकूण 3260 दिव्यांग लाभार्थीची तपासणी करण्यात आली. यामध्ये दृष्टीहीन 422, बौद्धिक अपंगत्व 656, श्रवणदोष 517, लोकोमोटर अपंगत्व 1366, बालरोग 299 असे एकूण 3260 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर शिबिराचा पाचवा दिवस व बार्शी तालुक्याचा पहिला दिवस दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी शिबिर घेण्यात आले. बार्शी येथील शिबिरात दोन दिवसात 1 हजार 599 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दृष्टीने 170, बौद्धिक अपंगत्व 304, श्रवणदोष 268, लोकोमोटर अपंगत्व 585, बालरोग 137 तर औषधे देण्यात आलेले रुग्ण 135 आहेत, अशी माहिती संचालक अभिजीत राऊत यांनी दिली. तसेच माळशिरस ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी तपासणीसाठी यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न