(संपत मोरे यांचा लेख) सुरेश जाधव यांच लहानपणापासून एकच स्वप्न होत,चांगला पैलवान व्हायचं. त्याचे आजोबा आणि वडील पैलवान होते.तोच वारसा चालवण्यासाठी सुरेश तालमीत सराव करत होता. वास्तदाकडून कुस्तीचे डाव शिकत होता. काही वर्षातच त्याने केलेल्या मेहनतीमुळे तो चांगला पैलवान झाला. भागातील मैदान गाजवू लागला.कुस्त्या करू लागला. त्यांच नावं झालं.पैलवान म्हणून लोक बोलवायची तेव्हा त्याचा उर भरून यायचा. एक दिवस गावातील तालमीत कुस्तीचा सराव सुरू होता. सुरेशची लढत सुरू होती.तालमीतील सगळी पोरं लढत बघत होती. तेवढ्यात’आई ग.…असा आवाज आला.लढत सुरू असताना समोरच्या पैलवणाकडून सुरेशचा हात ओढला गेला.त्याचा हात दुखावला गेला.तो दुखवलेला हात घेऊन तो बाहेर आला.
त्याच्या घरच्यांनी हातावर खूप उपचार केले. ठिकठिकाणी नेले पण हात कुस्तीच्या लढतीच्या कामाचा राहिला नाही. डॉक्टर म्हणायचे”हाताला विश्रांती द्या”म्हणजेच कुस्ती खेळू नका. सुरेश निराश झाला त्याची कुस्ती थांबली.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील सुरेश जाधव यांची ही कथा आहे. हातामुळे कुस्ती सुटली. पोटासाठी काहीतरी काम करणं भाग होतं. मग नोकरीचा शोध सुरू झाला. नोकरी मिळाली पण हमालाची. एका फॅक्टरीत ते हमाल म्हणून काम करू लागले. कुस्तीसाठी कमावलेली ताकद हमाली करण्यासाठी वापरताना सुरेशला खूप वाईट वाटायचं. पण करणार काय?काही दिवस हमाली केल्यावर त्यांनी उसाची फिरती रसवंती सुरू केली. गावोगावच्या जत्रा,बाजारात जाऊन उसाची रसवंती चालवत होता. एक दिवस कुस्त्याचं मैदान होतं त्या मैदानावर सुरेश रसवंती घेऊन गेला. त्या मैदानावर कुस्तीची कॉमेंट्री करायला सुप्रसिद्ध कुस्तीनिवेदक ईश्वरा पाटील आलेले.त्यांचं अंगावर रोमांच आणणार निवेदन ऐकून सुरेश जाधव यांना हुरूप आला. ते त्या कॉमेंट्रीच्या प्रेमात पडले. कुस्ती मैदान असेल तिथं जायचं आणि मनापासून कॉमेंट्री ऐकायची. त्यांची ती प्रवाही निवेदनशैली ऐकून सुरेशला वाटलं आपणही अशी कॉमेंट्री केली तर?मग त्यांनी सराव सुरू केला. ध्यास घेतला. सुरेश सराव करायला लागला.
एक दिवस मेणी खोऱ्यातील कुस्त्यांचे मैदान पहाण्यासाठी प्रेक्षक म्हणून सुरेश गेलेला म्हणून गेलेले. मैदान भरलेले. दुरदुरुन लोक आलेले. पण मैदान सुरू होतं नव्हतं. या मैदानाला कॉमेंट्री करायला जे कुस्तीनिवेदक येणार होते. ते आलेले नव्हते. काय करावं?असा प्रश्न संयोजकांना पडला होता. ही गोष्ट सुरेश यांना समजली. ते संयोजकांजवळ गेले आणि निवेदन करण्याची इच्छा व्यक्त केली.मग संयोजकांनी या नवख्या तरुणाला कॉमेंट्री करण्याची संधी दिली. ओघवत्या भाषेत सुरू झालेल्या सुरेश यांच्या निवेदनामूळ काही वेळातच मैदानावर चैतन्य निर्माण झाले. त्यानां अगोदर कुस्तीचा इतिहास ऐकून मुखोद्गत झाला होता. आखाड्यात खेळणारे पैलवान आणि त्यांच्या काही महत्वाच्या लढतीही त्याला माहिती होत्या. त्यामुळं ओघवत्या शैलीत अगदी कसलेल्या निवेदकासारख त्यानी निवेदन करत मैदान जिंकलं. कुस्त्या संपल्यावर अनेक लोकांनी भेटून त्यांच कौतुक केलं. त्यादिवशीपासून सुरेश जाधव यांनी मागं वळून पाहिलंच नाही.गावोगावचे लोक त्यांना निवेदनासाठी बोलवायला लागले.शिराळा, शाहूवाडी, वाळवा, कराड, पाटण या तालुक्यातील अनेक गावांत मानधनाची अपेक्षा न करता गेले आणि जात आहेत.
सुरेश जाधव यांचा हात दुखावल्यामुळे कुस्तीत अपयश आले. नंतर त्यांना हमाली करावी लागली. उसाची रसवंती चालवावी लागली. त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज सुरेश जाधव आज कुस्तीचा युवा प्रचारक बनला आहे. स्वतःची ओळख सिद्ध केली आहे.एकाद्या गावात कुस्तीच्या मैदानावर सुरेश जाधव यांची प्रवाही कॉमेंट्री ऐकताना या माणसाला पस्तीस वर्षाच्या आयुष्यात अनेक संकटाना समोर जावं लागलंय हे पटत नाही. आयुष्यात अनेक वळण घेत स्वतःला सिद्ध करणारा हा तरुण आहे. स्वतःवर विश्वास असणारा हा माणूस पैलवानाच्या मनात निवेदनातून जिद्द पेरतो. कोणत्याही आडवळणी गावातून कुस्ती मैदानाची पत्रिका आली की हा माणूस मिळेल त्या वाहनाने जातो. खिश्यात किती पैसे आहेत याचंही त्याला भान नसतं. कारण अख्ख मैदान त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिलेलं असतं. कुस्तीसाठी भान विसरून धावणाऱ्या कुस्तीप्रेमी तरुणाची ही गोष्ट आहे.
-संपत मोरे
९४२२७४२९२५
More Stories
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम
अभिनंदन, श्रीलंकातून पोहत थेट भारतात…!
महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थ्यांनी मानसी सुहास काळे हिची जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे निवड