गेल्या एक वर्षापासून बार्शी शहर आणि परिसरामध्ये नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा अन्य काही कारणास्तव अडचणीमध्ये आलेल्या व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी भगवंत सेना दल कार्यरत आहे. “जनहिताय, जनरक्षणाय” हे ब्रीद घेऊन, गेल्या वर्षभरामध्ये बार्शी शहर आणि परिसरामध्ये अपघातग्रस्त, अनाथ, बेवारस अशा 30 लोकांचे जीव वाचवण्यामध्ये भगवंत सेना दल यशस्वी ठरले आहे.
अशाच एका पस्तीस वर्षे युवकाचा जीव वाचविण्यात भगवंत सेना दल यशस्वी ठरले आहे. रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास छत्रपती ग्रुप चे अध्यक्ष अजय पाटील यांनी भगवंत मैदानावर एक अनोळखी व्यक्ती दुपारपासून बेशुद्ध आणि जखमी अवस्थेमध्ये पडला असल्याचे भगवंत सेना दलाचे अध्यक्ष धीरज शेळके यांना फोनवरून सांगितले. भगवंता सेना दलाचे रणजीत देशमुख आणि दीपेश भराडीया हे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. यावेळी भगवंत मैदान या ठिकाणी आतील बाजूस एक युवक बेशुद्ध आणि जखमी अवस्थेमध्ये पडलेला दिसून आला. यावेळी अनेक जण फक्त बघ्याची भूमिका घेत इजा करत होते, तर काहीजण नुसतेच आजूबाजूला गोळा होऊन वेगवेगळे तर्क वितर्क काढत होते, पण मदतीसाठी एकही हात पुढे येत नव्हता.
याप्रसंगी लागलीच धीरज शेळके यांनी 108 क्रमांकाला फोन करून रुग्णवाहिका तात्काळ बोलावून घेतली. भगवंत सेना दलाच्या सदस्यांनी सदरील बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेल्या जखमी युवकाला 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय बार्शी या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर लाड यांच्यासह सर्व टीमने जखमी वरती तात्काळ उपचार चालू केले. दरम्यान घडलेला प्रकार हा बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांना देखील फोनवरून सांगण्यात आला. बालाजी कुकडे यांनी देखील तात्काळ आपली पोलिस यंत्रणा कामाला लावत ग्रामीण रुग्णालय येथे एक पथक पाठवून दिले. उपचारादरम्यान अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर सदरील युवक हा पूर्णपणे शुद्धी वरती आल्यानंतर तो टिळक चौक येथील असल्याचे समजले. यानंतर भगवंत सेना दलाचे अध्यक्ष धीरज शेळके यांनी नातेवाईकांशी संपर्क करून सदरील घटनेची माहिती नातेवाईकांना दिली.
या मोहिमेमध्ये भगवंत सेना दलाचे रणजीत देशमुख, दीपेश भराडिया व छत्रपती ग्रुप चे अध्यक्ष अजय पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले असून त्यांचे बार्शी शहर व तालुक्यातून कौतुक केले जात आहे. आपत्कालीन काळामध्ये मदतीसाठी 9922914009 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भगवंत सेना दलाचे अध्यक्ष धीरज शेळके यांनी केले आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!