नवी दिल्ली, दि. 08 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आज वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 4 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. आज राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये एका शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती यांच्या हस्ते वर्ष 2020 मधील पहिल्या टप्प्यातील पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. वर्ष 2020 मध्ये विविध क्षेत्रातील 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 16 मान्यवरांना पद्म भूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मान्यवरांचा समावेश आहे. आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये महाराष्ट्रातील 4 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. रमण गंगाखेडकर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री गंगाखेडकर हे वरिष्ठ विषाणूशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल ऍण्ड रिसर्च(ICMR) या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. सरिता जोशी यांना हिंदी, मराठी, गुजरातीमध्ये अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री प्रदान करून गौरविण्यात आले. गेल्या 7 दशकात त्यांनी दूरचित्रवाणी, नाटक आणि सिनेजगतात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
कंगना राणावत यांना हिंदी सिनेसृष्टीतील अभिनय क्षेत्रातील कार्यासाठी आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती राणावत यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. सिनेक्षेत्रातील गायनासाठी अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्री सामी हे संगीतकारही आहेत.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद