कोरफळे या गावातील गेली ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित व रखडलेला शेत /पाणंद कच्च्या रस्त्याचा प्रश्न, शेतक-यांच्या आपसांतील समोपचाराने मिटविला.
महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत / पाणंद रस्ता योजनेअंतर्गत कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे अशी कामे घेता येतात. हा शेत / पाणंद रस्ता सार्वजनिक विभागाच्या मापदंडाप्रमाणे बांधण्यात येणार आहे.
गावातील अनेक शेत रस्ते हे देखील अन्य महामार्ग एवढेच महत्त्वाचे आहेत. शेतात पीक तयार होताच ते काढून योग्य ठिकाणी साठवले गेले पाहिजे किंवा बाजारात विकले गेले पाहिजे. परंतु रस्ता नीट नसल्यामुळे शेतकऱ्यांना ते करणे शक्य होत नाही. पावसाळ्यात निघणारे पिके आर्थिक दृष्ट्या कितीही फायदेशीर असली तरी, रस्त्या अभावी ती विकण्याचा विचार शेतकऱ्यांना करता येत नाही. पाणंद रस्त्याची अनुपलब्धता यासाठी मोठा अडथळा आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वय साधून शेतकरी कल्याण हा केंद्रबिंदू मानून शेतकरी बांधवांना या योजनेत उस्फूर्तपणे सहभागी करून, यातून शेतकऱ्यांच्या विकासाचा, प्रगतीच्या मार्गाचा रस्ता खुला होण्यास हातभार लागणार आहे. यामुळेच शेतकरी बांधव लोकप्रतिनिधींकडे शेत रस्त्याची मागणी करताना दिसून येत आहे.
शेतकरी बांधवांच्या या मागणीनुसार मी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणंद रस्त्यांचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. आत्ता पर्यंत माझ्याकडे तालुक्यातून मागणी झालेल्या जवळपास १० ते १५ शेती / पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे.
वरील सर्व बाबींच्या अनुषंगानेच तालुक्यातील कोरफळे या गावातील जुना शेत / पाणंद कच्चा रस्ता व कोरफळे ते श्रीपत पिंपरी ह्या रस्त्याचा गेली ४० ते ५० वर्षांपासून रखडलेला प्रश्न शेतकरी बांधव व प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन, पाहणी करून, यशस्वीरित्या चर्चा करून मार्गी लावला आहे. या रस्त्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध झाला असून, आता हा तंटा मिटल्यामुळे राहिलेल्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.
हा प्रश्न मिटविण्याकरीता तहसीलदार सुनील शेरखाने, तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सौरभ होनमुटे, भूमी अभिलेख कार्यालयाचे झांबरे, माजी जि. प. उपाध्यक्ष कौरव आप्पा माने, माजी नगरसेवक विलास आप्पा रेणके, आप्पा भोसले ( विठ्ठल टेलर ), बाळासाहेब घोडके व या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे शेतकरी बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत