धाराशिव जिल्ह्यातील ३.५ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना खरीप – २०२० पीकविमा नुकसान भरपाई ३ आठवड्यात देण्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाने संवेदनशीलपणे निर्देशित केले आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित जपत त्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. घरोघरी गौरी गणपतीचे पूजन होत असताना या निर्णया मुळे साक्षात देवी लक्ष्मीची पाऊले बळीराजाच्या घरी अवतरली आहेत असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

देशभरातील शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ अधिक हितकारक करण्यासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयावेळी मा.सर्वोच्च न्यायालयात उपस्थित असल्याने, या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. हा दिवस माझ्या आयुष्यातील एक मोठा आनंदाचा, अविस्मरणीय व मौल्यवान दिवस आहे.
मा.उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पीकविमा कंपनीने मा.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती खंडपीठाने अतिशय संवेदनशील व बारकाईने शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या विषयाची संपूर्ण माहिती घेत विमा कंपनीची याचिका नामंजूर केली.
मा.उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मा.सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी बांधवांना न्याय दिला आहे. विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयाकडे जमा केलेले रुपये २०० कोटी, त्यावर जमा झालेले व्याज तसेच शेतकऱ्यांना देय असलेली उर्वरित रक्कम ही विमा कंपनीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
देशभरात प्रथमच पीकविमा नुकसान भरपाई बाबत अशा प्रकारचा शेतकरी हिताचा निर्णय झाल्यामुळे, पीकविमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप मिळाला आहे व त्यामुळे बळीराजाला खऱ्या अर्थाने नैसर्गिक आपत्ती पासून पुढील काळात संरक्षण मिळेल.
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण देणारी कल्याणकारी, हिताची व कवच देणारी योजना म्हणून पुढे आणली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांची हक्काची नुकसान भरपाई मिळण्यावर सर्वोच्च मोहोर झाली आहे.
काल दिवसभरात ज्येष्ठ विधीज्ञ यांच्याबरोबर अनेक बैठका घेऊन सुनावणीची नियोजनबद्ध तयारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे या प्रक्रियेत खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले असे ते म्हणाले.
राज्य व केंद्र सरकारचे या कामी पुरेपूर सहकार्य होते. जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा, मा.सर्वोच्च न्यायालयातील तज्ञ विधीज्ञ ॲड.श्री.सुधांशू चौधरी व विधीज्ञ ॲड. श्री.राजदीप राऊत यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. आमदार पाटील यांनी सत्यमेव जयते! अशी टॅगलाइन वापरत समाज माध्यमातून ही महिती दिली.
More Stories
गोरोबा काकांचा समाधी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा :- तहसीलदार डॉ मृणाल जाधव
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक