यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली देवकर हिच्या घरच्या बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीची माहिती कळताच तिला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार छकुलीला तात्काळ एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी आज केली.
सैैराट च्या माध्यमातून करमाळा अकलूज तालुक्यातील नागराज मंजुळे, आकाश ठोसर, रिंकु राजगुरू, म्होरक्या, कस्तुरी या चित्रपटात बार्शीतील अभय चव्हाण, अमर देवकर, विनोद कांबळे असे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक, कलाकार, प्रोड्युसर सोलापूर जिल्ह्यातून मिळाले. या सर्व कलाकारांची पार्श्वभूमी पहाता हे सर्वच कलाकार हे सामान्य कुटुंबातील आहेत व प्रतिकूल परिस्थितीत चित्रपट निर्मिती करून राष्ट्रीय, अंतर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली.
त्यातच भर घालत कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी मोहोळ तालुक्यातील शंकर धोत्रे यांच्या
‘पोटरा’, या मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली प्रल्हाद देवकर ( वय १५ वर्षे ) हिचा ‘पोटरा’ हा पहिला चित्रपट असून आजवर तिने कोणत्याही चित्रपट अथवा नाटकात भूमिका केलेली नाही. तिला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावची रहिवासी असलेल्या कु. छकुलीच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आणि हलाखीची आहे. तिच्या कुटुंबियांना राहण्यास स्वतःचे घर नसून गावातील एका फाटक्या झोपडीत छकुली आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. तिचे वडील आजारी असून ते अंथरुणावर पडून असतात आणि आई मोलमजुरी करते, ही माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना कळताच त्यांनी छकुलीला आर्थिक मदत देऊन तिच्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी पुढील शिक्षणाचे नियोजन करण्याचे निर्देश चित्रनगरी प्रशासनाला दिले होते. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चित्रनगरी प्रशासनाने तात्काळ पावले उचलत छकुलीला एक लाख रुपयांचा धनादेश आणि अभिनय क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी तिच्या कुटुंबियांच्या सल्ल्याने महामंडळाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी आज जाहीर केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद