Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > सोलापूर जिल्ह्यात सर्व तालुक्यात २३ ते ३० ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा

सोलापूर जिल्ह्यात सर्व तालुक्यात २३ ते ३० ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा

सोलापूर जिल्ह्यात सर्व तालुक्यात २३ ते ३० ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन

सोलापूर: महाराष्ट्र राज्य नाविन्यतापूर्ण स्टार्टअप धोरण 2018 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने तसेच राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही यात्रा सोलापूर जिल्ह्यामध्ये 23 ऑगस्ट रोजी दाखल होत असून यात्रेदरम्यान तालुकास्तरीय प्रचार, प्रसिध्दी व जनजागृती अभियान तसेच जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र संपन्न होणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.

तालुकास्तरीय प्रचार प्रसिध्दी व जनजागृती अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणी स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक वाहन(मोबाईल व्हॅन) पाठविण्यात येणार आहे. यावेळी यात्रेबाबत संपूर्ण माहिती, नाविन्यतापूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात येणार आहे. यासाठी दि. 23 ऑगस्ट रोजी माळशिरस तालुक्यात, 24 ऑगस्ट रोजी करमाळा तालुक्यात 25 ऑगस्ट रोजी माढा व मोहोळ तालुका, 26 ऑगस्ट रोजी बार्शी तालुक्यात, 27 ऑगस्ट रोजी पंढरपूर व सांगोला तालुकास्तरीय सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच दि.29 ऑगस्ट रोजी मंगळवेढा तालुक्यात व सोलापूर शहर, 30 ऑगस्ट रोजी अक्कलकोट तालुकास्तरीय सत्र संपन्न होणार आहे.

तालुकास्तरीय यात्रेचे ठिकाण तालुक्यातील संबंधीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नामांकित महाविद्यालय हे असणार आहे. जेणेकरून स्थानिक पातळीवरील नवउद्योजक, शैक्षणिक संस्था, इच्छुक उमेदवार यांना नजिकच्या ठिकाणी सहभागी होता येईल. तालुकास्तरीय जनजागृतीनंतर पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार असून यामध्ये नाविन्यता तसेच उद्योजकताबाबत माहिती देण्यात येणार आहे. यावेळी नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र देखील आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय सादरीकरणातून 10 विजेते निवडण्यात येणार असून ते राज्यस्तरीय सादरीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. सादरीकरणाद्वारे समोर येणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पना विचारात घेऊन जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रामधील विजेत्यास 25 हजार रूपये तर राज्यस्तरावरील विजेत्यास एक लाख रूपये रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यामध्ये सहभागी व्हावे व नवउद्योजकतेच्या या उपक्रमामध्ये सक्रिय योगदान द्यावे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर अथवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (संबंधीत तालुका, इन्क्युबेशन सेंटर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अथवा 0217-2950956 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.