‘गेटवे ऑफ इंडिया येथे होणार लेझर शो’
मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ गेटवे ऑफ इंडिया येथे उद्या ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या मतदान पूर्वतयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, संचालक पंकज श्रीवास्तव, प्रधान सचिव अविनाश कुमार, सचिव सुमन कुमार, अवर सचिव अनिल कुमार हे शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ होईल. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एकाच वेळी मतदार जनजागृती अभियानाची सुरुवात होणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर जिल्हा यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील या शुभारंभास उपस्थित राहणार आहेत.
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, सिने कलाकार अर्जुन कपूर, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, गायक मिलिंद इंगळे, गायिका वैशाली माडे, गायक राहुल सक्सेना यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच दिव्यांग अधिकार क्षेत्रातील विराली मोदी, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत याप्रसंगी उपस्थित राहतील.
या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी सुनिश्चित करणे हा आहे. त्यादृष्टीने या शुभारंभ कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.
यामध्ये मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात येणार आहे. तर, डाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण केले जाईल. त्याचप्रमाणे मतदान करण्याविषयी शपथ देण्यात येईल. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात येणार आहे. मतदार जागृती रॅली, मतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण, फ्लॅश मॉब देखील यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.
गेट वे ऑफ इंडिया ते कुलाब्यापर्यंत मतदार जागृती रॅली
या कार्यक्रमानंतर गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली आयोजित करण्यात येईल. यामध्ये नागरिकांना मतदान प्रक्रियेतील महत्त्व आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जागरूक केले जाईल.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न