Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > फॅक्ट चेक > मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत वृध्दांना मिळणार लाभ सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत वृध्दांना मिळणार लाभ सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन

मित्राला शेअर करा

सोलापूर दि.23 :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पात्र वृध्दांना लाभ मिळण्यासाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज मागविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/ दुर्बलातेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक साधने/ उपकरणे खरेदी करणे तसेच योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र आदीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत निधीचे वितरण ऑनलाईन पध्दतीने (महाडीबीटी) 3 हजार रुपयांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थी लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे), लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. पात्र लाभार्थ्यांने बँकेच्या खात्यात रु. 3 हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे : 1) आधार कार्ड/ मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बॅकेची बँक पासबुक झेरॉक्स ,पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले), उपकरण/साहित्याचे दुबार लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले) आवश्यक आहे.

जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.