Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > घरपट्टी, वीज बिल विरोधात बार्शीत मोर्चा

घरपट्टी, वीज बिल विरोधात बार्शीत मोर्चा

शहरातील मागासवर्गीय आणि रमाई घरकुल लाभार्थ्यांना घरपट्टी माफ करावी, तसेच २०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी बार्शीत मोर्चा
मित्राला शेअर करा

बार्शी : शहरातील मागासवर्गीय आणि रमाई घरकुल लाभार्थ्यांना बार्शी नगरपालिकेच्या वतीने दिली जाणारी घरपट्टी माफ करावी, तसेच २०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी अन्याय विरोधी आंदोलनाच्या वतीने बार्शीत गुरुवारी सायंकाळी मोर्चा काढण्यात आला होता.


मोर्चाचे नेतृत्व आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे यांनी केले सायंकाळी सात वाजता लहुजी चौक येथून सुरू झालेल्या या मोर्चात माजी नगरसेवक किरण तोर, अमोल चव्हाण, श्रीधर कांबळे, पप्पू हनुमंते, कुणाल खंदारे, आनंद चांदणे, सुधाकर कांबळे सहभागी झाले होते. नगरपालिकेच्या हद्दीत सुमारे पाच हजार मागासवर्गीय यांची घरे आहेत. त्यांना ५० हजार ते एक लाख इतकी भरमसाठ घरपट्टी आली आहे. सर्व नागरिक मागासवर्गीय, गरीब व असंघटित कामगार असल्याने ते घरपट्टी वरील व्याज भरू शकत नाहीत.
मूळ घरपट्टी भरण्यास नागरिक तयार आहेत. परंतु मुख्य अधिकारी यांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे गोरगरिबांना नाहक त्रास होत असल्याची टीका नवनाथ चांदणे यांनी केली. ही घरपट्टी व घरपट्टी वरील व्याज आणि दोनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्यात यावे, या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.


या मोर्चामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. नगरपालिकेच्या माध्यमातूनच अण्णाभाऊ साठे योजना यातून या भागांमध्ये शासनाच्या आर्थिक कार्यक्रमातून घरांची कामे झाली आहेत. असे असताना याची घरपट्टी देखील शासनानेच अनुदान रुपात नगरपालिकेला द्यावी, अशी मागणीही या मोर्चाद्वारे नवनाथ यांनी केली नगरपालिकेने आकारलेल्या चक्रवाढ व्याजमुळे अनेक गोरगरिबांचे कंबरडे मोडले असल्याची टीकाही यावेळी माजी नगरसेवक किरण तौर यांनी केली.


हा मोर्चा शहरातील टिळक चौक, भोसले चौक, पांडे चौक, सोमवार पेठ, मार्गाने नगरपालिका व तहसील कार्यालय येथे आणण्यात आला. यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयावरही हा मोर्चा नेण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यासह नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे, विठ्ठल पाटोळे यांना देण्यात आले. मोर्चात विजय वाघमारे, दादा जाधव, धनंजय शिंदे, पांडुरंग वाघमारे, रामा शिंदे, गणेश शिंदे, कुंडलिक लोंढे, अक्षय अवघडे, बालाजी अवघडे, किरण शेंडगे यांच्यासह महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसा उन्हाची तीव्रता आणि गोरगरिबांचा रोजगार वाया जावू नये या कारणास्तव पहिल्यांदाच हा मोर्चा सायंकाळी आयोजित केला होता. सर्व अधिकारी ही निवेदन स्वीकारण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत कार्यालयात बसून होते.