Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > जिल्ह्यातील 24 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्ह्यातील 24 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्ह्यातील 24 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
मित्राला शेअर करा

जिल्ह्यातील 24 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मंद्रुप येथील कौशल्य विकास केंद्राच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तर शासकीय आयटीआय व जे. डी. पाटील केंद्राच्या शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती

शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ग्रामीण भागातील युवक व युवतींना स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता सोलापूर जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतीसह राज्यातील एकूण 511 ग्रामपंचायत मध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र कार्यक्रम सुरु करण्यात आला असून, त्या केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन द्वारे करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवर उपस्थित होते.

“प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” मध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छूक उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देणार येणार आहे. सदर प्रशिक्षण केंद्रामध्ये 10 वी, 12 वी, पदवी, डिप्लोमा धारक यांना प्रशिक्षण मिळणार आहे. जिल्हायातील 24 प्रमोद महाजन कौशल विकास केंद्र तालुकानिहाय पुढीलप्रमाणे

अक्कलकोट तालुक्यामध्ये नागणसूर, जेऊर, बार्शी तालुक्यामध्ये पांगरी, मळेगांव, करमाळा तालुक्यामध्ये जेऊर, वांगी, माढा तालुक्यामध्ये टेंभूर्णी, मोडनिंब, माळशिरस तालुक्यामध्ये यशवंतनगर, माळीनगर, खंडाळी, मंगळवेढा तालुक्यामध्ये संत दामाजीनगर, भोसे, मोहोळ तालुक्यामध्ये कुरूल, पेनूर, पंढरपुर तालुक्यामध्ये करकंब, कासेगांव, टाकळी (ल), सांगोला तालुक्यामध्ये महूद बु, कोळा, उत्तर सोलापुर तालुक्यामध्ये नानज, दारफळ (बीबी), दक्षिण सोलापुर तालुक्यामध्ये कुंभारी, मंद्रुप अशा विविध ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मंद्रूप येथील शासकीय आयटीआय मध्ये आयोजित जे.डी पाटील कौशल्य केंद्राचे उद्घाटन यावेळी झाले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर तहसीलदार लिंभारे, पोलीस निरीक्षक प्रशांत घुले, आयटीआयच्या प्राचार्य करुणा कठारे, मनोज देशमुख यांच्या सह आयटीआयचे व जे.डी. पाटील संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापुर जिल्हयातील 24 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रावर सर्व महाविद्यालय तसेच शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी तसेच त्या त्या तालुक्यातील नजीकच्या प्रशिक्षण केंद्रावर ग्रामस्थ व मान्यवर नागरिक मोठया संख्येने कार्यक्रम ठिकाणी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी शासकीय अथवा खाजगी नोकरी करण्यापेक्षा स्वयंरोजगार सुरू करावा – जिल्हाधिकारी

शहरी अथवा ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित शिक्षण आत्मसात करणे आवश्यक आहे. शासकीय अथवा खाजगी नोकरी करण्यापेक्षा आजच्या तरुण पिढीने आपली आवड व आपल्या गावात अथवा शहराला गरज असलेल्या कोणत्याही एका ट्रेडचे कौशल्य मिळवून आपला स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करावा. व इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी केले.

मंद्रूप शासकीय आयटीआय मध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय तसेच महाविद्यालयीन काळातच आपल्याला कोणत्या विषयाचे कौशल्य प्राप्त करायचे आहे. त्याचे ज्ञान घेणे गरजेचे असून त्यावर आधारित आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःसह आपल्या गावाचा विकास साधावा. अत्यंत मन लावून व परिश्रम घेऊन अभ्यास करावा. स्वतःचे आत्मनिरीक्षण करून आपल्या स्वतःमधील उणीव शोधाव्यात व त्यावर परिश्रम घेऊन सुधारणा करावी व कौशल्य आत्मसात करावे.

मेट्रोपॉलिटीन शहरातील तरुण वर्ग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्टार्टअप सुरू करण्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. त्याच पद्धतीने ग्रामीण भागात ही स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. यासाठी शासकीय आयटीआय तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.