प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांची बार्शीत घोषणा
बालपणापासून सर्व जाती धर्मातील लोकांसोबत वाढलो आ .राऊत
डिसेंबर-जानेवारीमध्ये बार्शी येथे होणाऱ्या सहाव्या समतावादी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आ. राजेंद्र राऊत यांच्या निवडीची घोषणा महाराष्ट्र साहित्य सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते मच्छिंद्र सकटे यांनी आज केली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, नियोजन समिती अध्यक्ष जयकुमार शितोळे, ज्येष्ठ मार्गदर्शक कॉम्रेड तानाजी ठोंबरे, सचिव विक्रम सावळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा डॉ. सकटे म्हणाले, आमदार राजेंद्र राऊत स्वागताध्यक्षपदी झाल्याने बार्शीत होणारे संमेलन हे महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारे संमेलन ठरेल. बार्शीला अनेक संमेलनाचा वारसा आहे. शाहीर अमर शेख यांची ही भूमी आहे, अमरशेख आणि अण्णाभाऊ साठे यांची मैत्री जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच त्यांचाही विचार या संमेलनातून द्यायचा आहे, असे प्रतिपादन डॉ सकटे यांनी केले. कॉम्रेड ठोंबरे म्हणाले, समतावादी विचारांचा जागर या संमेलनातून होणे गरजेचे आहे.
श्री. शिवाजी महाविद्यालय येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालय सभागृह या ठिकाणी संयोजन समितीच्या झालेल्या बैठकीत स्वागताध्यक्षपदी आमदार राऊत यांची घोषणा करण्यात आली.
आमदार राऊत म्हणाले, मी माझ्या जन्मापासूनच सर्वच जाती धर्मातील नागरिकांसोबत राहत असल्यामुळे समतेचा वारसा मला मिळाला लहानपणापासूनच आहे. समाजवादी नेते पन्नालाल सुराणा हे माझ्या वडिलांचे मित्र असल्याने माझ्या घरी येत असत. तसेच माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि स्वर्गीय मधू दंडवते यांचाही माझ्या वडिलामुळे मला सहवास लाभला आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माझी निवड झाल्याने मी निश्चितच या संमेलनाच्या उंचीला न्याय देण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले.
संयोजन समितीचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास संयोजन समितीचे उपाध्यक्ष वासिम पठाण, शंकर वाघमारे, विजयश्री पाटील, कार्याध्यक्ष संदीप आलाट, निमंत्रक सुनील अवघडे, श्रीदेवी शेळके, अमोल आंधळकर, शब्बीर मुलानी, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, उमेश पवार प्रा. श्रीमती सुरवसे, प्रा. डॉ. श्रीमती राठोड ऍड. अमोल आलाट, सतीश झोंबाडे, संगीतराव शिंदे, दयावान कदम, विवेक गजशिव,आनंद कसबे सर, राजेंद्र अडसूळ आदी उपस्थित होते.
More Stories
राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जाहीर
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली