सोलापूर : सोलापूरच्या सायन्स सेंटरमध्ये मिग 21 या लढाऊ विमानाचे सुपर सॉनिक इंजिन दाखल झाले आहे. याशिवाय, हवाई दलाने अलीकडेच एक निवृत्त झालेले फायटर जेट केंद्राला भेट म्हणून दिले आहे. विशेष म्हणजे या फायटर जेटच्या कॉकपीटमध्ये बसून तुम्ही संपूर्ण विमानाची माहिती जाणून घेऊ शकणार आहात. त्यामुळे एअरोडायनॅमिक्सची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. या शिवाय प्रात्यक्षिकातून विज्ञान शिकवणारे अनेक प्रयोग या विज्ञान केंद्रात आहेत.
सायन्स सेंटरच्या इमारतीत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अनौपचारिक अध्यापनाला चालना देत असताना केंद्राने अडीच एकर जागेवर विज्ञान उद्यान उभारले आहे. पार्कमध्ये सिद्धांत-आधारित कंपन, गणित, संवेदना, गुरुत्वाकर्षण, संगीत, ध्वनी आणि बरेच काही यावर 58 प्रात्यक्षिके आहेत. याच पार्कमध्ये हे फायटर जेट बसवण्याचा विज्ञान केंद्राचा विचार आहे. दिवाळीच्या सुट्टीत जर तुम्हाला एक दिवसाची सहल करायची असल्यास सोलापूरच्या या सायन्स सेंटरला अवश्य भेट द्या.
भारताचे माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून सोलापुरातील हे सायन्स सेंटर उभे राहिले आहे. 2010 साली तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या सायन्स सेंटरचे उद्घाटन झाले. तेव्हापासून विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे सायन्स सेंटर खुले आहे. राज्यात मुंबई आणि नागपूरनंतर तिसरे सायन्स सेंटर हे सोलापुरात आहे.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम