Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > कोरोना काळात मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना 50 लाखाची मदत मिळणार

कोरोना काळात मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना 50 लाखाची मदत मिळणार

सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडील रिक्त असलेल्या सफाई कामगारांची पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करावी
मित्राला शेअर करा
                                       - राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगचे सदस्य पी.पी. वावा 

सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडील रिक्त असलेल्या सफाई कामगारांची पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करावी

सफाई कामगारांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगचे सदस्य यांची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न
सोलापूर, दिनांक 14 :- कोरोना काळात मृत्यू झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांची मदत दिली जात आहे. सोलापूर जिल्हयात अशा प्रकारे मृत्यू झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना या योजनेतून मदत करणे आवश्यक आहे. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी कोरोना काळात सफाई कामगारांचा मृत्यू झालेला असेल तर संबंधित कामगाराच्या वारसांना अशी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी. वावा यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागातील सफाई कामगार यांच्या पदाच्या आढावा बैठकीत श्री. वावा बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी जिल्हाधिकारी शमा पवार, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोकरे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.


राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य श्री. वावा पुढे म्हणाले की, कोरोना काळात ज्या सफाई कामगारांचा मृत्यू झालेला आहे अशा सफाई कामगारांच्या वारसांना केंद्र शासनाच्या वतीने 50 लाखाची मदत देण्यात येत आहे, या मदतीचा लाभ संबंधित कामगारांच्या वारसांना मिळवून देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावेत. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतून सफाई कामगारांना पाच लाखापर्यंतचा वैद्यकीय खर्च देण्यात येत आहे. तसेच सर्व शासकीय व निम शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयात असलेल्या सफाई कामगारांच्या पदांच्या भरती बाबत त्वरित कारवाई करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सुचित केले.


सर्व यंत्रणाकडील सफाई कामगारांना वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून मिळाव्यात, त्याप्रमाणेच प्रत्येक महिन्याला सफाई कामगारांना पगारपत्रक उपलब्ध करून द्यावे, सफाई कामगारांना युनिफॉर्म उपलब्ध करून द्यावा. सर्व शासकीय यंत्रणांनी सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीमध्ये समावेश करून घ्यावा. सफाई कामगारांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर पाच सदस्य जिल्हास्तरीय सफाई कामगार तक्रार निवारण समिती स्थापन करावी. या समितीची प्रत्येक तीन महिन्यातून एकदा बैठक घेऊन त्यामध्ये आलेल्या सफाई कामगारांच्या तक्रारीचा निपटारा करावा, असे निर्देश श्री. वावा यांनी दिले.
यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोकरे यांनी जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायती व महानगरपालिका च्या अधिनस्त सफाई कामगारांच्या अनुषंगाने सविस्तर माहिती बैठकीत दिली. तसेच सफाई कामगारांना देण्यात येत असलेल्या सोयी सुविधा विषयक माहितीही त्यांनी दिली.